पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । महाबळेश्वर । महाबळेश्वर भागातील स्ट्रॉबेरीस भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून येथे उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी सारखे उत्पादन कोठेही होत नसून या स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. स्ट्रॉबेरीला प्राप्त भौगोलिक मानांकनाचा उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी उत्पादकांनी एकत्र येऊन पणन मंडळांच्या योजनांचा लाभ घ्यावा व एकत्रित येऊन विक्री तंत्र अवलंबवावे, असे आवाहन सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत “स्ट्रॉबेरी पीक उत्पादन, सुगी पश्चात हाताळणी, विपणन, प्रक्रिया संबंधी कार्यशाळा” भिलार ता. महाबळेश्वर येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. या कार्यशाळेस सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाचे प्रकल्प संचालक दिपक शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, पणनचे सह सचिव डॉ. धपाटे, कृषीचे उपसंचालक विजय राऊत, कृषी व पणन विभागाचे अधिकारी तसेच महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरची नवीन ओळख आहे. यासाठी स्व. बाळासाहेब भिलारे व येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांना आधिकाचा फायदा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या मँग्नेट प्रकल्पात स्ट्रॉबेरीचा समावेश केला आहे. मँग्नेटसाठी स्ट्रॉबेरी पिकासंबंधी महाबळेश्वर भागातील दोन संस्थांचे प्रस्ताव आहेत. या माध्यमातून स्ट्रॉबेरीच्या काढणी पश्चात हाताळणीसाठी प्रशितकरण, शीतगृह, पॅक हाउस, शीतवाहन, प्रक्रिया युनीट इत्यादी सुविधा निर्माण होणार आहेत.

मॅग्नेट अंतर्गत स्ट्रॉबेरी पिकाची शास्त्रोक्त लागवड, काढणी पश्चात हाताळणी, विक्री व प्रक्रिया यासाठी उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था व इतर घटकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिका येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रधान सचिव अनूप कुमार म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्ट्रॉबेरी उत्पादनामध्ये देशपातळीवर अग्रेसर असून महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भौगोलिक स्थान निर्देशन मानांकन प्राप्त झाले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी जीआय मध्ये नोंदणी करुन घ्यावी तसेच क्यूआर कोडचा जास्तीत जास्त वापर करावा. भिलार ता. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमुळे येथे ॲग्रो टुरिझम हब तयार होईल. टिश्यू कल्चर लॅब तयार करण्यासाठी कृषि विभाग, कृषि विद्यापिठे व इतर विभागाच्या सहकार्यातून प्रयत्न करण्यात येईल. स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिकेचे येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी वाचन करावे म्हणजे स्ट्रॉबेरीच्या संदर्भात अधिकाधिक माहिती मिळण्यास मदत होईल.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक पध्दतीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. पाऊस व लहरी हवामानामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाबळेश्वर येथे टिश्यू कल्चर लॅब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाबळेश्वर येथील स्थानिक बाजारपेठेसाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधीची तरतूद करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येईल. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा पॉलिसी घेणेही आवश्यक आहे.

यावेळी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांच्या हस्ते स्ट्रॉबेरी पीक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी स्ट्रॉबेरी विक्री व प्रक्रियेसंबंधी, बाजारपेठ व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पणनचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!