वाळू तस्कर व मटकेवाले यांना अभय ; हात ओला तर मैतर भला अशी पोलिसांची भूमिका
स्थैर्य, वाठार स्टेशन, दि. ०६ : वाठार स्टेशन ही कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या ठिकाणी प्रशस्त असे पोलीस ठाणे असून या पोलिसठाण्याअंतर्गत ४७ गावांचा समावेश होतो परंतु काही दिवसांपूर्वी या वाठार पोलीस ठाण्यातून एक अजब असा तुगलकी फतवा काढल्याचे दिसून येत आहे. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नागेशशेठ जाधव हे मैदानात उतरले असून त्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे बोलताना आपले मत व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नागेशशेठ जाधव म्हणाले की, वाठार स्टेशन पोलिसांचा कारभार हा अजब प्रकारे चालला आहे वाठार स्टेशन ही बाजारपेठ ही शांतता प्रिय अशी बाजारपेठ आहे येथे व्यवसायासाठी आजूबाजूच्या गावातून लोक येत जात असतात बऱ्याच गावातून तर लोक शांत संयमी गाव असल्याने वास्तव्यास देखील आहेत अशा शांततामय नांदत असलेल्या गावामध्ये वाठार पोलिसांकडून बळजबरीने व्यापाऱ्यांना सोशल डिस्टनसिंगच्या नावाखाली पाचशे पाचशे रुपयांच्या पावत्या दिल्या जातात. गोरगरीब जनतेची अशी चाललेली लूट लवकरात लवकर थांबवा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहुद्या असे मत नागेशशेठ जाधव यांनी मांडले. जाधव पुढे म्हणाले कोरोनासारखी आपत्ती व या आपत्तीमधील नियमांचे आम्ही व्यापारी म्हणून जरूर पालन करतो परंतु गावातून राजरोसपणे भरधाव वेगाने होत असलेली वाळू तस्करी व भर वस्तीत चाललेला मटका पोलिसांना का दिसत नाही. यावर मग हात ओला तर मैतर भला असे म्हणणे योग्य ठरेल असे वाटते. एक तर लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे मोठ्या प्रमाणावर आर्थिक चणचण भासत आहे यातच पोलिसांचा पाचशे रुपयांची पावती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम हे वाठार स्टेशन पोलीस करीत आहेत.
लवकरात लवकर ही शांतता भंग करण्याचे काम पोलिसांनी थांबवावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नागेशशेठ जाधव यांनी सांगितले यावेळी नागेशशेठ जाधव, माजी सरपंच ऋषीभैय्या जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.