स्थैर्य, दि. २९: पंजाबमध्ये बठिंडा जिल्ह्यातील विर्क खुर्द गावाच्या पंचायतीने आंदोलकांच्या समर्थनात एक विचित्र फरमान काढला आहे. यात म्हटले आहे की, गावातील प्रत्येक घरातील एका सदस्याने दिल्ली बॉर्डरवज जावे, नाहीतर 1500 रुपये दंड भरावा. दंड न भरल्यास, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल. पंजाबमधील इतर पंचायतदेखील अशाप्रकारचा प्रस्ताव पास करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
26 जानेवारीला दिल्लीमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतर सरकारने केलेल्या कठोर कारवाईनंतर शेतकरी आपल्या घरी जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पंचायतींनी मोर्चा सांभाळण्याची तयारी दाखली आहे. गुरुद्वारांना ही घोषणा करण्याससांगितले आहे की, आंदोलन अजूनही सुरू आहे, सर्वांनी दिल्ली पोहचावे.
गावातील व्यक्तीला सात दिवस दिल्लीत राहणे गरजेचे
विर्क खुर्द पंचायतीच्या फरमानमध्ये हेदेखील म्हटले आहे की, आंदोलनात जाणाऱ्या सदस्याला तिथे कमीत-कमी सात दिवस राहावे लागेल. आंदोलनात कोणाच्या वाहनाचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई संपूर्ण गाव करेल.