दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । खंडाळा । धनगरवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत एका ढाब्यासमोर विचित्र झालेल्या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी अथवा जखमी झाले नाही. विशेष म्हणजे अपघातग्रस्तातील एका लक्झरी बसमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हेही प्रवास करीत होते. यावेळी सुजात आंबेडकर यांनी अपघात झाल्यानंतर मदतकार्यामध्ये मोलाची मदत केली. याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, धनगरवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एका ढाब्यासमोर एक फरशी भरलेला मालट्रक महामार्गालगत थांबलेला होता. दरम्यान, 12 जून रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर बाजूकडे निघालेल्या भरधाव वेगातील एका लक्झरी बसने संबंधित मालट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लक्झरीची मालट्रकला जोरदार धडक बसली. यावेळी लक्झरी बसच्या भरधाव वेगात असलेल्या एका कारने संबंधित लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी अचानकपणे संबंधित कारच्या पाठीमागे असलेल्या भरधाव वेगातील शिवशाही बसने कारला जोरदार धडक दिली तर दुसऱ्या लक्झरी बसच्या पाठीमागे असलेल्या आणखी एका वाहनाने लक्झरी बसला धडक दिली. परंतू संबंधित वाहनाने घटनास्थळावरुन पलायन केले. यावेळी अचानकपणे विचित्र घडलेल्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी अथवा जखमी झालेले नाही. यावेळी अपघातग्रस्त एका लक्झरी बसमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हेही एका खाजगी कामानिमित्त गोवा याठिकाणी जाण्यासाठी प्रवास करीत होते. यावेळी अपघातानंतर सुजात आंबेडकर यांनी मोलाची मदत केली.