दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । सातारा । ‘’माणूस छोट्या छोट्या स्वार्थासाठी आपल्या माणसाना व समाजाला वेठीस पकडतो आणि नैतिक पातळीवरून घसरत जातो.आपली संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. ती भोगावर आधारलेली नाही. जेंव्हा समाजाच्या तळात जाऊन लेखक बारकाईने निरीक्षण करतो तेंव्हा त्यास अनेक सूक्ष्म अनुभव मिळतात. त्यातूनच त्याला नवीन आशय मिळत असतो. अनुभवाच्या धगाट्यांत माणूस जेवढा जळून निघतो तेंव्हा त्याचे शब्द आशयाने आणि अभिव्यक्तीने प्रभावी आविष्कार घडवीत असतात. त्यातूनच कथा उभी राहते. आपल्या मातीतून जन्मास आलेल्या या कथारसिकांना भावत असतात. कथाकथन करताना मनुष्य स्वभावाचे गहिरे ज्ञान असावे आणि आशय व्यक्त करण्यासाठी शब्दांची समृद्धी सुद्धा आवश्यक असते.मातीतल्या कथा या माणूसपण समृद्ध करतात असे मत येथील प्रसिद्ध कथाकथनकर अमितकुमार शेलार यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या कथाकथन कार्यक्रमात शेवटी मनोगत व्यक्त करीत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी परिषदेच्या सचिव साक्षी घाडगे याही उपस्थित होत्या. अमितकुमार शेलार यांनी यावेळी गुलाबजाम ही कथा सादर केली. हास्याचा धबधबा त्यावर कारुण्याची झालर , श्रावणातील उन पावसाच्या खेळाप्रमाणे कधी हसायला लावत तर कधी आतून रडायला लावत ,कधी वैगुण्यावर बोट ठेवत तर कधी चिमटे काढत त्यांनी कथाकथन केले त्यामुळे विद्यार्थ्यांना हसू आणि आसुचे आणि जीवनातील विसंगतींचे दर्शन घडले. शब्दनिष्ठ ,प्रसंगनिष्ठ व इत्यादी विनोदांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन उच्चतर शिक्षा अभियान योजनेच्या सहाय्याने करण्यात आले. अध्यक्षीय भाषण करताना उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख म्हणाले की’ आज इंग्रजी माध्यमांच्या शालामुळे आज हे मराठी भाषिकांचे संस्कार कमी पडत आहेतदूर जात आहेत.ग्रामीण कथेमुळे जीवनातील उदात्ततेचे दर्शन घडले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.समीक्षा चव्हाण व कु. सोनाली जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे यांनी मानले. या कार्यक्रमास वाड्मय मंडळ प्रमुख डॉ.सविता मेनकुदळे,कमवा आणि शिका योजनेचे प्रा.राहुल वराडे पाटील.एन.सी.सीचे लेफटनंट के.एल.पवार,नवनाथ ढाणे,रवींद्र वाघमारे,बडेकर,डॉ.कांचन नलवडे ,प्रा.प्रियांका कुंभार ,महाविद्यालयातील मराठी व अन्य विभागातील साहित्यप्रेमी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.