दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या निसर्गाच्या लहरीपणाचा सोयाबीन पिकाला जास्त फटका बसला आहे. सध्या काही ठिकाणी सोयाबीन काढणी, तर काही ठिकणी कापणीचं काम सुरु आहे. एकीकडे अस्मानी संकट उभे असताना व्यापारीही सोयाबीन काट्यावर येताच मॉश्चरायजरच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा सुलतानी लूट करीत आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार न केल्यास रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष सोनू उर्फ प्रकाश साबळे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी दिला.
याबाबत जिल्हाधिकारी, डीडीआर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवथर येथील भरत मारुती साबळे यांनी सातारा बाजार समितीत सोयाबीन विक्रीस आणले असता त्याचे वजन १४९६ किलो भरले पण त्यातील मॉश्चरायजरच्या नावाखाली त्यापैकी ३७७ किलो कमी करण्यात आले. अशा यंत्राची आता किती विश्वासर्हता आहे. हा यानिमित्ताने संशोधनाचा विषय असेल पण तब्बल तीन क्विंटल ७७ किलोची कटती पाहून शेतकऱ्याचे डोळे पांढरे झाले. याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांची ही हिच अवस्था आहेे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, राज्यात काही ठिकाणी शेतीमाल हमीभावपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सातारामध्ये व्यापारी सोयाबीन पिकाची खरेदी करताना मॉश्चरायजरच्या नावाखाली कपात मोठ्या प्रमाणात करत आहेत. ही लुट तत्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.