दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२३ | फलटण |
निंभोरे (ता. फलटण) गावच्या जत्रेतील कुस्ती आखाड्यात शनिवारी गोंधळ घालण्यात येऊन दगडफेक करण्यात आली. यावेळी कुस्ती आखाड्यासाठी आणलेली इनामाची ७० हजार रुपयांची बॅग आयोजकांना जखमी करून लंपास केल्याची फिर्याद शिवाजी तुकाराम जाधव (रा. निंभोरे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून कल्पेश पांडुरंग कांबळे, ऋषिकेश भाऊसो कांबळे, विशाल बापू घाडगे, योगेश बाळासो कांबळे, अमित सतीश कांबळे, सौरभ विजय कांबळे (सर्व रा. निंभोरे, ता. फलटण) यांच्यावर चोरीसह गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. १८ मार्च रोजी निंभोरे गावच्या यात्रेतील कुस्ती आखाड्यात सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास निंभोरे गावातील श्री राजवल्ली पीरसाहेब दर्ग्याचे शेजारी असलेल्या पालखी तळावरील कुस्त्यांच्या आखाड्यात गावातील कल्पेश पांडुरंग कांबळे, ऋषिकेश भाऊसो कांबळे, विशाल बापू घाडगे, योगेश बाळासो कांबळे, अमित सतीश कांबळे, सौरभ विजय कांबळे (सर्व राहणार निंभोरे) हे आखाड्यात येऊन गोंधळ घालून किशोर पोपटराव मोरे यांच्याकडे कुस्त्याचे इनाम देण्यास असलेली सत्तर हजार रुपये रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन दगडफेक केली. यात निलेश यास जखमी केले व पैशाची बॅग घेऊन पळून गेले आहेत, अशी तक्रार शिवाजी तुकाराम जाधव (रा. निंभोरे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी वरील सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास अझख शिंदे करीत आहेत.