स्थैर्य, सातारा, दि. 18 : येथील कासट मार्केटमध्ये लॉकडाऊन काळात दारूची वाढीव दराने विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध साठा करणार्या दोघांना शहर गुन्हेप्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. तानाजी बडेकर, अजय उर्फ पांड्या घाडगे दोन्ही रा. रविवार पेठ सातारा अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून 50 हजारांचा दारु साठा हस्तगत केला आहे. संशयीतांवर महाराष्ट्र दारु बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, लॉकडाऊनमधील दि.17 ते 26 या कालावधीत कडक अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर सातारा शहरात मोठ्या प्रमाणात चोरटी दारु विक्री होण्याचा संभव लक्षात घेवून पो.नि. आण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस सुचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणचे पो. उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांच्या पथकाने दि. 18 रोजी सकाळपासूनच शहरात पेट्रोलींग सुरू केले होते. या पथकास रविवार पेठेतील कासट मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दारूचा अवैध साठा करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी जावून शोध घेतला असता एका घरामधून तसेच बंद गाळ्यामधून देशी-विदेशी दारुचा साठा जप्त आढळून आला. हा दारुसाठा संशयीत तानाजी बडेकर, अजय उर्फ पांड्या घाडगे दोन्ही रा. रविवार पेठ सातारा यांनी लॉकडाऊन कालावधीत वाढीव दराने चोरटी विक्री करण्याच्या हेतुने करुन ठेवला असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेवून देशी व विदेशी दारुचा सुमारे 50 हजार 798 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा संशयीतांवर महाराष्ट्र दारु बंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख व पो. नि. आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांच्या पथकातील हवालदार प्रशांत शेवाळे, पो. ना. शिवाजी भिसे, पो. ना. अविनाश चव्हाण, पो. कॉ. अभय साबळे, किशोर तारळकर, विशाल धुमाळ, गणेश घाडगे, संतोष कचरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.