स्थैर्य, फलटण, दि. ९ (अमित पंडीत) : फलटण नगरपरिषद हद्दीतील शंकर मार्केट परिसरातील बाहुली शाळेच्यानजिक असलेल्या मुतारीचे ड्रेनेज गेल्या अनेक दिवसांपासून फुटल्याने मुतारीतील घाण रस्त्यावर येवून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून पालिकेने या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शंकर मार्केट परिसरात बाहुली शाळेजवळ सार्वजनिक मुतारी आहे. भाजी विक्रेते, परिसरातील व्यावसायिकांकडून याचा वापर होत असतो. मुतारीच्या आसपास शाळा, दवाखाने, रहिवाशी घरे असताना वास्तविक या ठिकाणची मुतारी सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र या मुतारीचे ड्रेनेज फुटल्याने मुतारीतील घाण रस्त्यावर येत असून परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. याची दखल संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.