
स्थैर्य, फलटण, दि. १२ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये एका दिग्गज व्यक्तिमत्त्व व स्वतः नगराध्यक्ष पद भुषवलेले आणि माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या पक्षप्रवेशामुळे ‘स्थैर्य’ने यापूर्वी दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
दैनिक ‘स्थैर्य’ने आपल्या वृत्तात सहा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. ही बातमी आता सत्यात उतरताना दिसत आहे. या पक्षप्रवेशांच्या मालिकेने फलटणच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून, राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.
‘स्थैर्य’च्या वृत्तानुसार, यापूर्वीच माजी नगरसेवक भीमदेव बुरूंगले आणि माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोन प्रवेशांमुळेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता या यादीत आणखी मोठ्या नावांची भर पडत आहे.
आज होणारा पक्षप्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामध्ये एका माजी नगराध्यक्षाचा आणि एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे. या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या प्रवेशामुळे हा त्यांच्या मूळ राजे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) ताकद शहरात लक्षणीय वाढणार आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वीच दोन माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आणि आज पुन्हा दोन मोठी नावे राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. ‘स्थैर्य’ने वर्तवलेल्या सहाच्या आकडेवारीपैकी चार नावांची पुष्टी झाली आहे. या सलग पक्षप्रवेशांमुळे मूळ राजे गटाच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आता सर्वांचे लक्ष ‘स्थैर्य’च्या वृत्तातील पुढील दोन नावांकडे लागले आहे. ‘ते’ पुढचे दोन नगरसेवक कोण? ते कधी प्रवेश करणार? आणि ते कोणत्या भागातील आहेत, यावर आता शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या संभाव्य प्रवेशांमुळे विरोधी गटाची चिंता वाढली आहे.
एकूणच, या पक्षप्रवेश सत्राने फलटण नगरपरिषद निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापवला आहे. ‘स्थैर्य’ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरत असल्याने, राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘स्थैर्य’च्या वृत्तांकनाबद्दल विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे.
