“घरात रहा, खेळत रहा, तंदुरुस्त रहा…”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा

स्थैर्य, मुंबई, दि. 22 : कोरोनाच्या संकटकाळातही खेळांकडे दुर्लक्ष करु नका. घरात, घराच्या अंगणात, घराच्या गच्चीवर, सोसायटी आवारात शक्य आहे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करुन खेळ अवश्य खेळा. दररोज व्यायाम करा. शारिरिक हालचाली वाढवणारे, मानसिक तणाव कमी करणारे खेळंच, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास आपल्याला मदत करतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला, 23 जून या जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार हे जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकतरी खेळ अवश्य खेळला पाहिजे. खेळामुळे शरीर, मन तंदुरुस्त राहते. खेळभावना वाढीस लागते. कोरोनासंकटामुळे सध्या मैदानावर खेळण्यास निर्बंध असले तरी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात, आवारात, गच्चीवर जिथं शक्य आहे तिथं खेळलं पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे.

जागतिक ऑलिंपिक दिनी, दरवर्षी विविध स्पर्धांचं आयोजन करुन खेळाडूंना एकत्रित केलं जातं. मुलांमध्ये, युवकांमध्ये खेळांचा प्रसार व्हावा यासाठी उपक्रम राबविले जातात. यंदा त्यापैकी काहीही करता येत नसल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आहे. जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा देत असताना, महाराष्ट्राचा, देशाचा, भारतीय क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवण्यासाठी योगदान दिलेल्या खेळाडूंचं, क्रीडा संघटक, क्रीडा कार्यकर्त्यांचं, क्रीडा रसिकांचंही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले असून आभार मानले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे घरात रहा, पण खेळत रहा. तंदूरुस्त रहा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!