रोहन चव्हाण यांच्यासह अझीम मेटकरी आणि कृपाल अहिवळे यांचा भाजपमध्ये प्रवेश


स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजे गटाला धक्क्यांवर धक्के बसत असून, गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. राजे गटाचे कट्टर समर्थक मानले जाणारे युवा उद्योजक रोहन अशोकराव चव्हाण यांच्यासह मेटकरी गल्लीतील अझीम मेटकरी आणि कृपाल अहिवळे यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे महायुतीची ताकद आणखी वाढली आहे.

रोहन अशोकराव चव्हाण हे फलटणमधील एक प्रसिद्ध युवा उद्योजक असून, त्यांचे कुटुंब आणि ते स्वतः अनेक वर्षांपासून राजे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजे गटाच्या युवा फळीला मोठा धक्का बसला आहे. फलटण शहराच्या विकासासाठी आणि उद्योगवाढीसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्यासोबतच मेटकरी गल्ली परिसरातील अझीम मेटकरी आणि कृपाल अहिवळे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. अझीम मेटकरी यांच्या प्रवेशामुळे मेटकरी गल्ली भागात भाजपला बळ मिळाले आहे, तर कृपाल अहिवळे यांच्या येण्याने महायुतीची संघटनात्मक ताकद वाढली आहे.

या तिन्ही युवा नेत्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. “शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आणि तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रणजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणे काळाची गरज आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून राजे गटातील अनेक दिग्गज नेते, आजी-माजी नगरसेवक आणि आता युवा फळीतील कट्टर समर्थक गट सोडून जात असल्याने राजे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. निष्ठावंतांच्या या नाराजीचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी पक्षात नव्याने दाखल झालेल्या या युवा कार्यकर्त्यांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याने निवडणुकीच्या प्रचारात अधिक जोमाने काम करता येईल आणि विजयाचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

रोहन चव्हाण, अझीम मेटकरी आणि कृपाल अहिवळे यांच्या प्रवेशामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात या तिघांच्या जनसंपर्काचा फायदा महायुतीला होणार असून, प्रभागांमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.


Back to top button
Don`t copy text!