स्थैर्य, सोलापूर, दि. २६ : दैनिक सोलापूर तरुण भारतमध्ये दिलेल्या एका संपादकीय लेखाबबत कार्यकारी संपादक विजयकुमार पिसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीप्रकणी विविध पत्रकार संघांतर्फे संयुक्तपणे पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर महापालिका पत्रकार संघ, सोलापूर क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन या विविध संघटनांच्यावतीने संयुक्तपणे दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सोलापुरात सातत्याने पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येत आहे. दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संपादक विजयकुमार पिसे यांनी एका ज्येष्ठ नेत्याबद्दल संपादकीय लेख लिहिला होता. या लेखावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीडिया सेलचे जिल्हा समन्वयक मिलिंद गोरे यांनी कार्यकारी संपादक पिसे यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच पंढरपूरचे संदीप मांडवे या व्यक्तीनेदेखील फोन करून तशाच पद्धतीची धमकी दिली आहे दिली आहे. यामुळे विजयकुमार पिसे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या घटनेची तात्काळ दखल घेऊन धमकी देणार्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून पत्रकारांचे स्वातंत्र्य ठेवावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या वतीने उपायुक्त बापू बांगर यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी विजयकुमार पिसे यांच्यासह सोलापूर क्राईम रिपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कदम, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक शेळके, सागर सुरवसे, रमेश पवार, आफताब शेख आदी पत्रकार उपस्थित होते.