दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२२ । सातारा । अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात प्रतीदिन हजारो भाविक येऊन विठुरायाच्या केवळ दर्शनाने आपल्या भक्तीची भूक भागवतात. या धार्मिक नगरीत परंपरागत विठुरायाचा गजर भजन, कीर्तन, नामजप आदींच्या माध्यमातून त्याची भक्ती करतात. असे असतांना मंदिराचे सरकारनियुक्त कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मनमानी पद्धतीने मंदिरातील भजन, कीर्तन आणि नामजप यांवर तडकाफडकी बंदी आणली. ही कृती अवघ्या विठ्ठलभक्तांच्या भावना दुखावणारी असून हिंदु जनजागृती समिती या निर्णयाचा तीव्र निषेध करते. हा निर्णय घेण्यामागे ‘सभामंडपात मंदिर समितीचे कार्यालय असल्याने कामकाज करताना भजन-कीर्तनाचा त्रास होतो’ असे संतापजनक कारण देण्यात आले. मंदिराच्या देवनिधीतून मिळणारा पगार घेणार्या, मात्र धार्मिक परंपरांविषयी आदर नसणार्या आणि या परंपरा बंद करायला निघालेल्या अशा अधिकार्यांना मंदिर समितीतून हाकलायला हवे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील नायब तहसीलदार किशोर बडवे यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री संतोष पाटणे, गणपत पटेल, कैलास राणावत, डॉ. मानस कमलापूरकर, अतुल चव्हाण, सागर मोहिते, गणेश सुरवसे, अक्षय क्षीरसागर, लक्ष्मीकांत पाचंगे, सागर माळी, महेश चौधरी आदी उपस्थित होते.
समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिराच्या शासकीय समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी ‘भजन, कीर्तन आणि नामजप यांवर बंदी’चा आदेश काढण्यासंदर्भात मंदिराच्या अन्य विश्वस्तांना विश्वासात घेतले नाही, त्यांची बैठक घेऊन कोणतीही चर्चा किंवा ठराव संमत केला नाही, तसेच मनमानी पद्धतीने ‘तोंडी आदेश’ काढत हा निर्णय भक्तांवर लादला आहे. हे अतिशय अयोग्य आहे. हेच मंदिर समितीचे सुव्यवस्थापन आहे काय ?
समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या,
१. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समिती ही विठ्ठलद्रोही असून उपासनेवर बंदी आणणारी ही समिती बरखास्त करावी.
२. मनमानी पद्धतीने कारभार करणारे आणि धार्मिक परंपरांचा आदन नसलेले मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना तत्काळ बडतर्फ करून घरी पाठवावे.
३. मंदिर हे हिंदूंचे धार्मिक स्थळ आहे. येथील सर्व गोष्टी या हिंदूंच्या धार्मिक परंपरांप्रमाणेच व्हायला हव्यात; मात्र मंदिर समिती धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करून भाविकांच्या श्रद्धा पायदळी तुडवत आहे. ज्या उद्देशाने शासनाने या मंदिराचे सरकारीकरण केले होते, तो उद्देशच नष्ट झाला असून मंदिराचे पावित्र्य नष्ट करणे, धार्मिक गोष्टींत ढवळाढवळ करणे, देवनिधीत भ्रष्टाचार करून महापाप करणे यांसारखा सरकारी कार्यालयांपेक्षाही भयंकर गोष्टी येथे होत आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर सरकारीकरण मुक्त करावे आणि त्याचे व्यवस्थापन भाविकांच्या हाती सोपवावे.