स्थैर्य, फलटण, दि.२२: विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार्या शैक्षणिक शुल्कात सरसकट कपात करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका व शहरतर्फे फलटण तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर कदम, जिल्हा सरचिटणीस आदित्य भोईटे, तालुकाध्यक्ष अभिजित निंबाळकर, तालुका कार्याध्यक्ष आकाश यादव, तालुका उपाध्यक्ष निरंजन पिसाळ, आदम पठाण, तालुका सरचिटणीस सचिन काकडे, गौरव पवार, प्रतिक पवार, तालुका संघटक प्रथमेश शेलार, स्वप्निल पिसाळ, शहर उपाध्यक्ष गौरव नष्टे, शहर संघटक ओम पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत आपण आपल्या शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी. त्याचबरोबर लायब्ररी, प्रयोगशाळा, इंटरनेट, जिमखाना, शैक्षणिक सहल, वार्षिक कार्यक्रम आदी ज्या सुविधा विद्यार्थी सद्यस्थितीत वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये. ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला शाळा- महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये. नर्सरी,1 ली ते 10 वीचे शिक्षण देणार्या शिक्षण संस्थानी पुस्तके, वह्या आदी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करु नये. तसेच बोर्डाने जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत. दुसर्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये, आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला आहे.