दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । पंढरपूर । महाराष्ट्रातील आदिवासी जमातीवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी एक आदीवासी जमातीचा मंत्री केला तर आमच्या आदीवासी जमातीला त्याचा फायदा होईल.
म्हणून जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताताई सोनवणे यांना आदीवासी मंत्री पद द्या अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आषाढी एकादशी निमित्त तिर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये श्री विठ्ठलाची शासकीय पुजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते त्या वेळेस महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी ही मागणी केली.
त्याच बरोबर उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यावी, पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी उभा करण्यात यावी, आदीवासी महादेव कोळी समाजाचे दाखले सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे.
त्याच बरोबर नमामी चंद्रभागेचे काम सुरू करून त्या कामाला निधी मिळावा व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागा नदी मधील स्मारकाला निधी मिळावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गणेश अंकुशराव यांनी केली. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.