दैनिक स्थैर्य । दि. ४ जुलै २०२१ । पिंपोडे बुद्रुक । गेल्या सात दिवसाच्या 240 कि.मी.च्या खडतर पायी प्रवासामध्ये अनेक अडचणीवर मात करून सर्व पक्षीय कार्यकर्ते अखेर राजभवनात मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबाबतचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देऊन या विषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
बहुजनांना पहिले आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिवशी फलटण कोरेगाव शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे, आणि राष्ट्रीय समाज पक्ष्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी मराठ्यांची राजधानी सातारा ते राजभवन मुंबई असा सात दिवसाचा खडतर प्रवास करून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची पदयात्रा मुंबई राजभवन येथे शुक्रवार दि.2 जुलै रोजी पोहचले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना विविध प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये पायी प्रवासातील सर्वपक्षीय कार्यकर्ते शिवसेनेचे अमोल आवळे, राष्ट्रीय समाज पक्ष्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जयेंद्र लेंभे, भाजपचे नितीन चव्हाण, आरपीआयचे किशोर सोनवणे, शिवसेनेचे दत्ता जाधव, यांनी निवेदनासह राज्यपाल यांची भेट घेतली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सातारा ते मुंबई 240 किलोमीटरचा खडतर पायी प्रवास केला. अनेक ठिकाणी प्रवासात पदयात्रेचे फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत केले, काही कार्यकर्त्यांनी तर पेढे भरवून आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच कुणी प्रवासादरम्यान चहापाणी नाश्त्याची सोय, तर कुणी अन्नदान केले. प्रवासादरम्यान चालत असताना भरपूर अडचणी आल्या, चालून चालून पायांना फोड व जखमा झाल्या. प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी वरुणराजाने सुद्धा साथ सोडली नाही, पावसात भिजत व थंडीत ही सुद्धा हिंमत न हरता मराठा मुस्लिम व धनगर आरक्षण मागणीच्या भावना राज्यपालांच्या मार्फत देशाच्या पंतप्रधानांना पोहोचवण्यासाठी संकटांना मात करत, सात दिवसाचा खडतर पायी प्रवास करून पदयात्रा दोन जुलैला राजभवनात पोहोचली. त्यानंतर पाच ते सहा कार्यकर्ते यांच्यासमवेत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यामध्ये अमोल आवळे यांनी आरक्षण विषयीच्या आपल्या भावना राज्यपाल महोदय यांच्याकडे व्यक्त केल्या. राज्यपाल आणि पदयात्रेतील कार्यकर्त्यामध्ये पंचवीस मिनटाच्या चर्चेमध्ये आरक्षणाच्या मागणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पायी प्रवास करुन व निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना प्रथम महोदय राज्यपाल यांनी नाश्ता,जेवणाची व्यवस्था करुन,आस्थेने विचारपूस केली.