लालपरी आता सीएनजीवर! प्रदूषण आणि खर्च कमी करण्याचा महामंडळाचा प्रयत्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 18 जुलै 2024 | पुणे | डीझेलच्या वाढत्या किमती, तुटवडा आणि होणाऱ्या प्रदूषण यांमुळे राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पुणे विभागातील लालपरी (एसटी बस) हळूहळू सीएनजीवर (कंप्रेस्ड नॅचुरल गॅस) धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरूर, राजगुरूनगर, बारामती आणि सासवड या चार आगारांमधील १३२ लालपरी बसना सीएनजीत रुपांतरित करण्यात आले आहे. पुणे विभागात एकूण १४ आगार असून दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात.

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत आणि त्यामुळेच महामंडळाने नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर भर दिला आहे. या जुन्या बस डीझेलवर चालतात आणि डीझेलच्या किमतीत होत असलेली वाढ ही महामंडळाच्या खर्चात वाढ करणारी ठरत आहे. यामुळे आर्थिक तोटा होत आहे. या आर्थिक तूटीला पर्यायी उपाय म्हणून डीझेलवरील लालपरी बस सीएनजीवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि तसेच इंधनाचा खर्चही कमी होईल. पुणे विभागातील सर्व डीझेल बस या पुढील वर्षभरात सीएनजीमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहेत.

पुणे एसटी विभागात सध्या जवळपास ८०० पेक्षा जास्त बसेस आहेत. त्यापैकी ७०० ते ७५० बस मार्गावर धावतात. यापैकी ५०० बस जुन्या झाल्या आहेत आणि त्या सर्व बस सीएनजीमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहेत. यासाठी बारामती, शिरुर, सासवड आणि मंचर या चार आगारांमध्ये स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पुढील दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल. तसेच सासवड आणि शिरूर आगारांमध्ये खासगी वाहनांनाही सीएनजी पुरवठा करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि तसेच महामंडळाचा इंधनावरील खर्चही कमी होईल. यामुळे प्रवाशांना स्वस्त आणि स्वच्छ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.


Back to top button
Don`t copy text!