स्थैर्य, दि.२६: राज्य शासनाच्या नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने शाळा व शिक्षकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. हा निर्णय रद्द करावा या संबंधीचे पत्र १७ सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर सादर केले आहे.
अभ्यंकर यांनी संघटनेच्यावतीने दिलेल्या पत्रात आरटीई कायद्यानुसार निर्णय किती विसंगत आहे ते मुद्देसूद मांडले आहेत. या निर्णयामुळे प्राथमिक शाळांतील वर्ग खोल्या अपूर्ण पडतील व माध्यमिक शाळेतील वर्ग खोल्या रिकाम्या राहतील तसेच बहुसंख्य शिक्षक अतिरिक्त होतील व समायोजन करण्यात अडचणी निर्माण होतील. वेतन संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात. पत्रात अभ्यासपूर्ण असे मुद्दे मांडून हा १६ सप्टेंबर २०२० चा निर्णय रद्द करावा अशी विनंती केली आहे. शिक्षक सेनेच्या विभागाचे व जिल्ह्याच्या पदाधिकार्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यंत आपल्या पत्रातील माहिती पोहचवण्याचे नियोजन करावे व ही माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहचवण्याची व्यवस्था करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष जोतिराम साळी व जिल्हा पदाधिका-यांनी केले आहे.