
स्थैर्य, सातारा, दि. 14 नोव्हेंबर : जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालयाद्वारे येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेस आजपासून प्रारंभ झाला. त्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेत मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, कोल्हापूर या आठ विभागांतील एकूण 240 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा 14, 17, 19 वर्षांखालील गटात घेण्यात येत आहे. या वेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे प्रमुख संघटक जयेंद्र चव्हाण, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होणवडजकर, डॉ. नीलकंठ श्रावण हे दोघे तांत्रिक समिती सदस्य म्हणून उपस्थित होते. सातारा जिल्हा चेसअसोसिएशनचे खजिनदार मनोजकुमार तपासे यांचीही उपस्थिती लाभली.
या स्पर्धेत मुख्य पंच म्हणून इंटरनॅशनल आर्बिटर शार्दूल तपासे, उपमुख्य पंच इंटरनॅशनल आर्बिटर श्रद्धा विंचवेकर हे कामकाज पाहात आहेत. फिडे आर्बिटर योगेश रवंदळे, फिडे आर्बिटर यश लोहाणा, सिनियर नॅशनल आर्बिटर अपर्णा शिंदे, सिनियर नॅशनल आर्बिटर रोहित पोल, सिनियर नॅशनल आर्बिटर महादेव मोरे आणि स्टेट आर्बिटर ओंकार ओतारी हे पंच म्हणून काम पाहात आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अंकिता शिंदे, आयुषी बारटके, अपूर्व देशमुख, अंजली जाधव, आशिष मालपाणी, राहुल घाटे,राघव डांगे, प्रदीप पाटील, अनुराज रस्कतला, गौरव म्हांगडे, यश गोडबोले आणि इर्शाद शेख हे परिश्रम घेत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या संस्कृती मोरे यांनी आभार मानले.
