स्थैर्य, मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त व लोकप्रिय लेखिका नीला सत्यनारायण यांचं आज करोनामुळे निधन झालं. त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान सकाळी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७१ वर्षांच्या होत्या.
१९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून ३७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. गृहखाते, वनविभाग, माहिती व जनसंपर्क, समाजकल्याण, ग्रामविकास अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
कर्तव्यकठोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीला सत्यनारायण तितक्याच संवेदनशील होत्या. प्रशासकीय कामाच्या धबडग्यातून वेळात वेळ काढून त्या लेखनाचा छंद जोपासत होत्या. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक खूपच लोकप्रिय ठरले होते. उद्योजक व्यवसायाशी संबंधित त्यांनी लिहिलेले ‘सत्यकथा’ आणि वनविभागाच्या सचिव म्हणून आलेल्या अनुभवांवरील ‘एक दिवस (जी)वनातला’ हे पुस्तकही गाजले होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केलं होतं. कविता लेखन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. सत्यनारायण यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या होत्या. काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनही केलं होतं. सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं.करोनामुळं गेल्या काही दिवसांत अधिकारी पदावरील अनेक व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे.