नांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल – पालकमंत्री अशोक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१८: नांदेडमधील क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी बजावता यावी, यासाठी सराव करण्याची सुविधा मिळण्यासाठी कौठा येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी २५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भात पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच मुंबईत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, किशोर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

श्री.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडूंना सर्वच खेळांसाठी आधुनिक सुविधा असलेले क्रीडांगण मिळावे, यासाठी कौठा येथे क्रीडा संकुल उभारण्यात यावे. या संकुलात मैदानी तसेच इनडोअर खेळांसाठीच्या सुविधा निर्माण कराव्यात. हे क्रीडा संकुल स्वखर्चावर चालविले जावे, यासाठी नियोजन करावे. तसेच क्रीडांगणाच्या खर्चासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

जिल्हाधिकारी श्री. इटनकर यांनी क्रीडा संकुलाच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण केले. या संकुलात ॲथलेटिक ट्रॅकसह बॅडमिंटन, स्केटिंग, जलतरण अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

 कसे असेल क्रीडा संकुल

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिन्थेटिक ॲथलेटिक ट्रॅक, प्रेक्षकांसाठी पॅव्हिलियन, बहुविध खेळांचे बहुउद्देशीय बंधिस्त क्रीडांगण असणार. यामध्ये बँडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, हँडबॉल, जुडो-कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिमनॅस्टिक व स्कॅश आदी खेळांचा सराव करता येणार.

त्याचबरोबर या क्रीडा संकुलात ऑलंपिकच्या दर्जाचा जलतरण तलावही असणार आहे. याशिवाय तारांकित दर्जाची राहण्याची सुविधा, मोठे स्क्रिन, मल्टिकझिन कॅफेटेरिया, दुकाने, लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक सुविधांचाही समावेश या क्रीडा संकुलात होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!