
दैनिक स्थैर्य । 19 एप्रिल 2025। मुंबई । शासनाच्या ग्राम विकास विभागार्फत सन 2022-23 या वर्षासाठी उत्कृष्ट कार्य करणार्या गुणवंत अधिकारी व कर्मचार्यांचा गौरव करण्यात येतो. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुशराव फडतरे यांची निवड राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अविनाश फडतरे यांनी जिल्हा परिषद सातारा येथे काम करीत असताना कोविड काळात उत्कृष्ट कामकाज केले आहे. ग्रामपंचायत भवन बांधकाम, पाणी पुरवठा योजना, उपजीविका अभियान, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, पथदिवे योजना, विविध इमारत बांधकाम योजना, रोजगार हमी योजना, तसेच पंचायत राज यंत्रणेच्या डिजिटलायझेशन अशा अनेक विभागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या पारदर्शक प्रशासकीय प्रक्रियेतील योगदान, व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
या पुरस्कारामार्फत त्यांचे सकारात्मक प्रशासन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकाभिमुख कामगिरी यांची शासन स्तरावरुन दखल घेण्यात आली आहे. हा सन्मान त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रामाणिकता, काटेकोर नियोजन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो.
हा गौरव कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, इतर अधिकारी व कर्मचार्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. अविनाश फडतरे यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेतील सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.