दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा येथील सनराईज स्पोर्ट क्लब आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दि. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ रोजी दुपारी ४ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, खा. उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनराईज स्पोर्टचे सागर भोसले, अजय गायकवाड यांनी दिली.
स्पर्धेच्या आयोजनाचे हे २१ वे वर्षे आहे. सदरच्या स्पर्धा या खुल्या गटासाठी राहणार आहेत. या स्पर्धेसाठी रोख व चषक स्वरुपात पारितोषिक ठेवण्यात आली असून विजेत्या संघास ५0 हजार आणि चषक देण्यात येणार आहे. हे बक्षिस राहुल देव प्रमोटर्स आणि प्रतिक मकरंद पाटील, समृध्दी डेव्हलपर्स यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघास २५ हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. मयुर आनंदराव कणसे यांच्या स्मरणार्थ बक्षिसे दिले जाणार आहे. याचबरोबर वैयक्तीक बक्षिसे ही देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत बेस्ट डिफेंडर, बेस्ट हाफ, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट किपर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही वैयक्तीक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यातील कोल्हापूर, सांगली, पुणे, नागपूर, मुंबई , मुंबई उपनगर आणि सातारा जिल्ह्यातील १३ संघानी सहभागी नोंदवला आहे. या स्पर्धेसाठी २५ ते ५0 हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या पत्रकार परिषदेत संतोष जाधव, रवी हिलाल, सादिक व्यापारी, बबली सोलंकी, रविराज घोरपडे, संदीप साखर आदी उपस्थित होते.
अजय गायकवाड म्हणाले, साताऱ्यात फुटबॉल, क्रिकेटचे मैदान नसल्याने अनंत अडचणी येत आहेत, त्यामुळे शासनाने ही दोन्ही मैदान विकसीत केली तर जिल्हाभरातील अनेक खेळाडूंना वाव मिळू शकेल. आज अनेक शाळांत फुटबॉल खेळले जाते पण तेवढे मैदान विकसित नाहीत त्यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.