पोंभुर्लेत ६ जानेवारीला ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण; राम शिंदे, नितेश राणेंच्या उपस्थितीत दिग्गजांचा होणार ‘सन्मान’


मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी, पोंभुर्ले येथे ६ जानेवारी रोजी राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. नामवंत पत्रकारांचा गौरव आणि महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लोकार्पण या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०५ जानेवारी : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आणि आद्य पत्रकार ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार’ सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी (फलटण) आणि पोंभुर्ले ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात राज्याच्या आणि गोव्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्पातील भव्य ‘दर्पण सभागृहात’ सकाळी १०:३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. श्री. राम शिंदे, गोवा विधानसभेचे अध्यक्ष ना. श्री. गणेश गावकर आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. श्री. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ हे असणार आहेत, तर मुंबई दूरदर्शनचे माजी साहाय्यक केंद्र संचालक जयेंद्र (जयु) भाटकर यांची विशेष उपस्थिती असेल.

या ‘कलमनायकां’चा होणार यथोचित गौरव

सन २०२५ च्या ‘दर्पण’ पुरस्कारासाठी निवड झालेल्या खालील मान्यवर पत्रकारांचा आणि माध्यम तज्ज्ञांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे:

  • श्री. राजीव साबडे (ज्येष्ठ पत्रकार, पुणे)
  • श्री. शंतनु डोईफोडे (संपादक, दै. प्रजावाणी, नांदेड)
  • श्री. बसवेश्‍वर चेणगे (संपादक, ‘गुंफण’ दिवाळी अंक, मसूर, जि. सातारा)
  • श्री. जीवनधर चव्हाण (ज्येष्ठ पत्रकार, सातारा)
  • श्री. प्रकाश कुलथे (संपादक, दै. स्नेहप्रकाश, श्रीरामपूर)
  • श्री. विजय पालकर (दै. लोकमत, सिंधुदुर्ग)
  • श्री. श्रीराम जोशी (कार्यकारी संपादक, दै. नगर टाइम्स, अहिल्यानगर)
  • श्री. अनिल काळबांडे (दै. सकाळ, यवतमाळ)
  • श्री. आशिष कदम (केंद्रप्रमुख, मँगो एफ.एम., कोल्हापूर)
  • श्री. युवराज पाटील (जिल्हा माहिती अधिकारी, पुणे)

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी लिखित व संपादित केलेल्या ‘‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर कर्तृत्त्वाचा एक शोध’ या त्रिखंडात्मक चरित्राचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा ग्रंथ बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकणारा ठरेल.

या सोहळ्यास जांभेकर कुटुंबीय, पोंभुर्ले व जांभे-देऊळवाडी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरी सर्व पत्रकार बांधवांनी आणि नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्‍वस्त मंडळाने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!