दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । फलटण । येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक तरुण भारतचे फलटण तालुका प्रतिनिधी प्रा.रमेश आढाव व ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक नवराष्ट्रचे फलटण तालुका प्रतिनिधी सुभाष भांबुरे यांना 6 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने देण्यात येणार्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ या संस्थेच्यावतीने आयोजित सदरचा पुरस्कार वितरण समारंभ मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले, जि.सिंधुदुर्ग येथे ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमत, कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
प्रा.रमेश आढाव हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून या माध्यमातून फलटण शहर व तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. भारत सरकारच्या रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, दूरसंचार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. सध्या ते फलटण तालुक्यातील गुणवरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही कार्यरत आहेत. तर सुभाष भांबुरे हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून दैनिक शिवसंदेश, तरुण भारत, पुण्यनगरी या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केले आहे. सध्या ते दैनिक नवराष्ट्रचे फलटण प्रतिनिधी म्हणून काम करत असून साप्ताहिक श्रीहरी सुभाषितचे ते संपादक आहेत. पत्रकारितेबरोबरच कृषी क्षेत्रात फरांदवाडी येथे कृषिक्रांती अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ते सक्रीय आहे.
या पुरस्काराबद्दल प्रा.रमेश आढाव व सुभाष भांबुरे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.