दैनिक स्थैर्य | दि. १६ जून २०२३ | कराड |
कराड येथे दि. १८ जून २०२३ रोजी कराड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. कराडमधील सौ. वेणूताई चव्हाण सभागृह येथे सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला २५ जिल्ह्यातील समन्वयक, अभ्यासक व व्याख्याते उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिलबापू घराळ व राजेंद्र निकम यांनी दिली.
या मराठा अधिवेशनाची माहिती देण्यासाठी कराड येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी संजय पवार, शहर अध्यक्ष संदिप काळे, वैशाली जाधव, विवेक कुर्हाडे, युवराज कुर्हाडे, उत्तम भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र निकम म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्यभरात समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले, ठोक मोर्चेही निघाले. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. वास्तविक ५० टक्क्यांवरील आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकणारे नाही. त्यामुळे मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतील ओबीसी कोठ्याअंतर्गत आरक्षण मिळायला हवे. यासाठी पुन्हा मराठा सामजात जागृती करण्यासाठी व समाजाची वज्रमूठ बांधण्यासाठी हे अधिवेशन आयोजित केले आहे.
अनिलबापू घराळ म्हणाले की, राज्यभरातील जवळपास २५ जिल्हयांतील समन्वयक अधिवेशनाला येणार आहेत, तर दहा व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. दोन सत्रात अधिवेशन चालणार आहे. मराठा समाजाला संविधानिक आरक्षण कसे मिळेल, याबाबत या अधिवेशनात विचारमंथन होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटी ठराव करण्यात येणार आहे. अधिवेशनाला येणार्या वाहनांसाठी आनेवाडी व शिंदेवाडी टोलनाका फ्री केला आहे.