
दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयास 2019 या वर्षासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार दि. 17 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे. सर्व विभागातून राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुधोजी महाविद्यालयाला प्राप्त झाला.
हा पुरस्कार महाविद्यालयाने वृक्ष लागवडीचे केलेले कार्य विचारात घेऊन दिलेला आहे. महाविद्यालयाने आपल्या 28 एकराच्या परिसरामध्ये 3000 पेक्षा जास्त झाडे लावून संपूर्ण परिसर हरित बनवलेला आहे. त्याबरोबरच महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध गावांमध्ये कॅम्पच्या आयोजनातून तसेच राज्यस्तरीय व विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांचे आयोजन करून वृक्ष लागवड करणे. जलसंधारणाची कामे करणे व पर्यावरण समतोलासाठी प्रबोधन करणे हे कार्य यशस्वीपणे व सातत्याने केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
प्रतिवर्षी महाराष्ट्र राज्य आपल्या सहा विभागांकरिता विभागीयपुरस्कार देत असते पुणे विभागातून मुधोजी महाविद्यालयास संस्था गटातून हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर विभागातून आलेल्या संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी समावेश केला जातो. वृक्ष लागवडीमध्ये मुधोजी महाविद्यालयाची कामगिरी अतिशय प्रशंसनीय व प्रेरणादायी अशी ठरलेली आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार व फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विषयक मोहीम हाती घेतलेली असतानाच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन महाविद्यालयाचे तत्कालीन प्रभारी प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त युनिट म्हणून महाविद्यालयाने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवनारे डॉ. सुधीर इंगळे या प्रकल्पाचे जनक आहेत. त्यांनी हरित महाविद्यालय ही संकल्पना घेऊन महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपल्या महाविद्यालय परिसरामध्ये केली व स्वच्छ महाविद्यालय हरित महाविद्यालय हा मंत्र देऊन यशस्वी अशी वाटचाल केली महाविद्यालयाच्या या हरित कामगिरीची दखल वनश्री पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली व हा प्रथम क्रमांकाचा एक लाख रकमेचा पुरस्कार महाविद्यालयास जाहीर झालेला आहे.
दि. 12 डिसेंबर 2022 पूर्वी महाराष्ट्र शासनाकडून वितरित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या या गुणगौरवाबद्दल समाधान व्यक्त करून राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे व विशेष करून अग्रस्थानी असणारे डॉ. सुधीर इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी, विद्यार्थी व महाविद्यालयाचा सेवक वर्ग या सर्वांच्या प्रयत्नांचा चांगला परिणाम असल्याचे मत व्यक्त करून विशेष कौतुक केले आहे.
वनश्री पुरस्कार म्हणजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा एक सकारात्मक परिणाम असल्याचे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीने सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले. मुधोजी महाविद्यालय यापुढेही फलटण तालुक्यातील जावली येथे सुरू असणाऱ्या महत्त्वकांक्षी पर्यावरण प्रकल्पामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे प्रतिपादन केले. तसेच यानिमित्ताने वनविभाग फलटण विविध स्वयंसेवी संस्था यांचे सौजन्य लाभल्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी झाला असल्याने त्यांचाही या पुरस्कार मध्ये अप्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे.