“आपली पेन्शन आपल्या दारी” मोहिमेला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । नांदेड । प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, यात लोकाभिमुखता यावी व पारदर्शकतेसमवेत सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा ही योजना सुरू केली.
सन २०२२-२३ या वर्षाकरीता घेतलेल्या सदर स्पर्धेचे निकाल राज्य शासनाने जाहिर केले असून विभागीय स्तरावरील निवड समितीद्वारे प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजना अनुदान घरपोच वाटप या अभिनव उपक्रमाला १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती मार्फत हे पारितोषिक शासन निर्णयाद्वारे आज १९ एप्रिल रोजी जाहीर केले आहेत.
समाजातील वृद्ध, निराधार, दिव्यांगजणासाठी शासनाने विविध आर्थीक लाभाच्या योजना सुरू केल्या आहेत. हे अर्थसहाय्य घेण्यासाठी प्रत्येकवेळी त्यांना बँकेपर्यंत जाण्यासाठी लागणारे कष्ट, वेळ व खर्च लक्षात घेता “आपली पेन्शन आपल्या दारी” ही अभिनव योजना अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्हाधिकारी म्हणून सुरू केली होती. या योजनेने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासमवेत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, वयोवृद्ध, अनाथ बालके आदी योजनेतील लाभार्थ्यांना याचा लाभ झाला.

नांदेड जिल्ह्यातही ही अभिनव योजना लवकरच सुरू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड जिल्ह्याचा विस्तार हा व्यापक आहे. यात किनवट, हदगाव, हिमायतनगर सारखे आदिवासी बहुल तालुकेही आहेत. सर्वसामान्यांना त्यांच्या योजनेचे लाभ विनासायास त्यांच्या पर्यंत पोहोचावेत अशी यंत्रणा उभी करण्याचा आनंद खूप वेगळा आहे. नांदेड जिल्ह्यातही “आपली पेन्शन आपल्या दारी” ही अभिनव योजना लवकरच कार्यान्वित करीत असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले. यासंदर्भात प्राथमिक नियोजन व पूर्व तयारी सुरू केली असून त्यांची लवकरच प्रचिती येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button
Don`t copy text!