सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२२ । मुंबई । कोरोना कालावधीत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने अतिशय चांगले काम केले. मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याची आवश्यकता असून त्या दिशेने राज्य शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना श्री. पवार बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भास्कर जाधव, महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, संचालक डॉ. साधना तायडे, हर्षवर्धन देशमुख, डॉ. समीर दलवाई आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही आरोग्य विभागाच्या व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. अलीकडेच पाच ते सहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी नियोजन केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोरोना कालावधीत आपण स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेतलेल्या आहेत. या सवयी कायम ठेवायला हव्यात. आरोग्याच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

तत्पूर्वी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेत कालसुसंगत बदल करण्यासाठी सूचना द्याव्यात. या योजनेत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश करता येईल का, याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, डॉ. साधना तायडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!