पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांस राज्य सरकारकडून ५ लाखांचे सहाय्य – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | भारत-पाकिस्तान हद्दीजवळ मच्छिमार नौकेतून मासेमारी करीत असताना पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्या श्रीधर चामरे (रा. वडराई जि. पालघर) यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

गुजरात राज्यातील ओखा (जि. वेरावळ) येथील ‘जलपरी-४’ ही मच्छिमार नौका ७ खलाशांसह २५ ऑक्टोबर रोजी ओखा येथे मासेमारीसाठी गेली होती. भारत-पाकिस्तान हद्दीनजिक मासेमारी करीत असताना दि. ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई येथील श्रीधर रमेश चामरे हे मृत पावले तर अन्य एक खलाशी जखमी झाला. या घटनेत मृत पावलेल्या श्रीधर चामरे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. दरम्यान, ठाणे- पालघरच्या सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!