स्थैर्य, 17 जानेवारी, सातारा : मुंबई शहर हे देशाचे मुख्य आर्थिक व औद्योगिक केंद्र असल्याने येथे विविध आव्हांनाना सामोरे जावे लागते. मुंबईत नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले यासारख्या घटनांचा धोका कायम असतो. शिवाय मुंबई हे विविध जाती, धर्म समुदायांचे मिश्रण असलेले शहर असल्यामुळे येथे विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. अशा सर्वच प्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांवर असते. मुंबई पोलिसांना राहण्यासाठी चांगले निवासस्थान असावे या हेतूने मुंबई पोलिस हौसिंग टाउनशिप प्रकल्पास मंजुरी देत राज्य शासनाने पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी 20 हजार कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
या अनुषंगाने आज मुंबई मधील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त असलेली महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ हि राज्य शासनाची अंगीकृत संस्था कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून मंजुरी दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मुंबई पोलीस दलाची संरचना ही ब्रिटिश कालखंडापासून अस्तित्वात असून मुंबई पोलिसांना अभिमानास्पद इतिहास व दीर्घकालीन परंपरा लाभलेली आहे. मुंबई पोलिसांचा इतिहास हा मुंबई शहराच्या प्रगतीशी जोडलेला असून, सन 1856 मध्ये स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय आज देशातील सर्वोत्कृष्ट व आधुनिक पोलीस दलांपैकी एक आहे. सद्यस्थितीत 94 पोलीस ठाणे, 5 सशस्र पोलीस दल व इतर विशेष शाखांची निर्मिती करण्यात आली असून सध्या 51,308 एवढे मनुष्यबळ मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणार्या पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना सुखी व समाधानी निवारा मिळण्यासाठी मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी व अम्मलदारांसाठी, (कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आयावश्यक असणारी), अंदाजे 40 ते 45 हजार शासकीय निवासस्थाने बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 5 कोटी चौरस फूट असून विकसन प्रकल्पाची अंदाजित किंमत रु. 20 हजार कोटी आहे.
ना. शिवेंद्रसिंहराजेंचे केले विशेष कौतुक
सातारा येथे पोलिसांसाठी आधुनिक सोयींनी युक्त अशी पोलीस वसाहत उभारण्यात आली असून ना. देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्यावर असताना त्यांच्या हस्ते या नूतन पोलीस वसाहतीचे लोकार्पण करण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातारा येथील पोलीस वसाहतीचेचा उल्लेख करून, वसाहतीचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करून घेतल्याबद्दल ना. फडणवीस यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.

