
स्थैर्य, औंध, दि.२७: औंध ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटर मध्ये मंगळवारी रात्री आँक्सिजन पुरवठा विभागात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कोव्हीड सेंटरमधील 15रुग्णांना खबरदारी साठी तातडीने वडूज व मायणी येथील खाजगी व शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास साळुंखे यांनी दिली दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी याठिकाणी उपस्थित राहून वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी यांना योग्य त्या सूचना करून कार्यवाही केली.
याबाबत औंध ग्रामीण रुग्णालयातून मिळालेली अधिक माहिती अशी, औंध येथील ग्रामीण 30बेडचे कोव्हीड सेंटर औंधसह खटाव तालुक्यातील रुग्णांसाठी सुरू करण्यात आले आहे.
याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना आँक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील दिड महिन्यापासून हे कोरोना सेंटर सुरळीत सुरू आहे मात्र मंगळवारी रात्री उशीरा अचानक आँक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने येथील कोरोना सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना 40ते 65वयोगटातील 15रुग्णांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये यासाठी तातडीने या रुग्णांना वडूज व मायणी येथे हलविण्यात आले यामध्ये दहा रुग्णांवर वडूज येथे तर पाच रुग्णांवर मायणी येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेची दखल घेऊन तहसीलदार किरण जमदाडे यांनी त्वरित याठिकाणच्या आँक्सिजन यंत्रणेची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधीतांना दिले असून बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून याठिकाणी आँक्सिजन सिलिंडर ,पाईपलाईन दुरूस्ती तसेच रुग्णालयातील प्रत्येक बेडला जोडलेल्या आँक्सिजन यंत्रणेची पाहणी व दुरुस्तीचे काम सुरू होते.
तहसीलदार किरण जमदाडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ युनूस शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ माने, डॉ संतोष मोरे, डॉ सम्राट भादुले व वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्ण सुखरूप असल्याची माहिती डॉ. विलास साळुंखे यांनी दिली.
प्रतिक्रिया…. औंध ग्रामीण रुग्णालयातील कोव्हीड सेंटरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे आँक्सिजन पुरवठा बंद पडल्याचे समजताच त्वरित त्याठिकाणी जाऊन 15रुग्णांना वडूज व मायणी येथे हलविले याकामी वैद्यकीय अधिकारी ,लोकप्रतिनिधी,कर्मचारी ,प्रशासकीय अधिकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली .यापुढे अशी कोणतीही समस्या खटाव तालुक्यातील शासकीय, खाजगी रुग्णालयात निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित आस्थापनांना देण्यात आल्या आहेत.