दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्हा स्वातंत्र सैनिकांचा तसेच लष्करातील आजी-माजी सैनिकाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न राहणार असून जिल्ह्याच्या विकासाची परंपरा अधिक वृद्धिंगत करणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. देसाई बोलत होते. ध्वजवंदनानंतर श्री. देसाई यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे भूमीपुत्र असल्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देऊन श्री. देसाई म्हणाले, आपल्या जिल्ह्याचे स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांना लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी मोलाची साथ दिली. गरीब कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षणाचा महत्वाचा निर्णय लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी घेतला.
जिल्ह्यातील धरण ग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न, जलसंपदाचे प्रकल्प तसेच रस्त्यांच्या पुलांची कामे पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेला आणखीन चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण करणार. जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यावश्यक व महत्वाचे असे प्रकल्प तसेच प्रलंबित कामे आहेत त्यांचा लवकरात-लवकर निर्णय घेतला जाईल.
जिल्ह्यामध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा अंतर्गत घरोघरी शासकीय, निमशासकीय, खाजगी इमारती अशा सर्वांनी ध्वजारोहण करुन उत्स्फुर्त सहभाग नोंदविला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सातारा जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात अग्रेसर राहून आपला क्रांतिकारी राष्ट्रप्रेमाचा वारसा जिल्ह्याने कायम राखला याचा विशेष अभिमान वाटतो, असे सांगून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.
राज्य उत्पादन मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार
स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शाळांचा सत्कार श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझरे ता. जावली, एस.वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले, ता. पाटण, पाटण व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल, पाटण.
यावेळी 75 फूट ध्वजस्तंभ उभारणीमधील काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता आर.टी. अहिरे, शाखा अभियंता आर.आर. आंबेकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक एस.एस. आटकेकर, संदिप निकम यांचा सत्कार करण्यात आला.
75 फुटी उंचीच्या ध्वजस्तंभाचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनावरण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या 75 फुटी ध्वजस्तंभाचे अनावरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.