मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार! निवडणूक आयोगाचे सुधारीत आदेश; ‘सायलेन्स पिरियड’चा संभ्रम दूर


  • राज्य निवडणूक आयोगाकडून प्रचार कालावधीबाबत महत्त्वाची सुधारणा

  • मतदान सुरू होण्याच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी रात्री १० वाजता प्रचार बंद

  • सभा, मिरवणुका, लाऊडस्पीकर आणि जाहिरात प्रसिद्धीवरही असणार कडक निर्बंध

स्थैर्य, फलटण, दि. २८ नोव्हेंबर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रचाराच्या कालावधीबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण सुधारीत आदेश जारी केला आहे. यानुसार आता मतदान ज्या दिवशी असेल, त्याच्या अगोदरच्या दिवशी रात्री १०.०० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी याबाबतचे परिपत्रक (दि. २७) जारी केले आहे.

नेमका बदल काय?

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ आणि आचारसंहितेच्या नियमावलीनुसार प्रचाराच्या अंतिम मुदतीबाबत काहीसा संभ्रम होता. काही ठिकाणी ‘मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास’ असा अर्थ लावला जात होता. मात्र, आयोगाने आता यात स्पष्टता आणली आहे.

सुधारीत आदेशानुसार, “मतदान सुरू होण्याच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी (उदा. जर ०२ तारखेस मतदान सुरू होत असेल, तर ०१ तारखेला) रात्री १०.०० वाजता प्रचार बंद होईल.”

रात्री १० नंतर कशावर बंदी?

प्रचार बंद होण्याच्या या वेळेपासून (रात्री १० नंतर) उमेदवारांना खालील गोष्टी करता येणार नाहीत:

  • कोणतीही जाहीर सभा घेणे किंवा भरवणे.

  • मोर्चा किंवा पदयात्रा काढणे.

  • ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker) वापर करणे.

  • निवडणूक प्रचाराशी संबंधित कोणतीही जाहिरात (Print or Electronic Media) प्रसिद्ध करणे किंवा प्रसारित करणे.

फलटणसाठी काय अर्थ?

फलटण नगरपरिषदेसाठी जर मंगळवारी, दि. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असेल, तर सोमवारी, दि. १ डिसेंबर रोजी रात्री १०.०० वाजता जाहीर प्रचार सक्तीने थांबवावा लागेल. त्यानंतर केवळ छुपे किंवा वैयक्तिक गाठीभेटींवर भर देता येईल. आयोगाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!