दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | फलटण |
सर्वसामान्य ग्राहकांच्या सुख-दु:खाच्या सर्व प्रसंगांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सदैव त्यांच्यासोबत आहे, अशी ग्वाही भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेचे शाखा प्रबंधक धवलराज इनामदार यांनी दिली.
फलटण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभार्थ्यांना चेकद्वारे रक्कम वितरित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
इनामदार पुढे म्हणाले की, सामान्य माणसाला वाजवी किमतीत विमा संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विमा योजना भारतीय स्टेट बँकेद्वारे राबवल्या जातात. अशाच एका खातेधारकाचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी शाखेत कार्यरत असणार्या कर्मचारी रूपाली विनायक काकडे यांना मिळाली. स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी याविषयीची सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. आवश्यक त्या ठिकाणी तहसील ऑफिसमधून देखील योग्य सहकार्य मिळाले. याचा परिणाम म्हणून विम्याची रक्कम विक्रमी वेळेत म्हणजे केवळ १८ दिवसात विमाधारकाच्या नॉमिनीला मिळाली.
प्रसंगाचे योग्य तारतम्य बाळगत कोणतीही प्रसिद्धी किंवा फोटो याचा हव्यास न ठेवता केवळ कर्मचारी व लाभार्थ्याचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत चेक देण्याचे हे कार्य पार पडले. तसेच श्री. इनामदार यांनी सदर व्यक्तीच्या पत्नीला उद्योग किंवा व्यवसाय यासाठी लागणारा वित्त पुरवठा आणि त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मकता दाखवली.
याप्रसंगी भारतीय स्टेट बँकेच्या फलटण शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.