सोलापुरात होणार स्टार्टअप फेस्टिव्हल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । सोलापूर । जिल्ह्यात रस्त्यांचे आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. यामुळे नव्याने उद्योग सुरू व्हावेत, असे वातावरण निर्मिती करावयाची आहे. स्थानिक आणि इतर नवउद्योजकांना चालना मिळण्यासाठी स्टार्टअप फेस्टिव्हल कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी देशभरातील नवउद्योजकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोलापूर स्टार्टअप फेस्टिव्हल आयोजनाबाबत प्राथमिक बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शासकीय तांत्रिक संशोधन व विकास परिषद नागपूरचे सदस्य सचिव केतन मोहितकर, मनपा उपायुक्त पुष्पगंधा भगत, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त सचिन जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू राजेश गडेवार, एम.एस. उडाशिवे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांच्यासह इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य, सिमेंट कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

स्टार्टअप फेस्टिव्हलच्या आयोजनासंदर्भात सर्व संबंधित विभाग, संस्था आणि इतर घटकांसमवेत प्राथमिक स्वरूपात कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. श्री. शंभरकर यांनी सांगितले की, उद्योजकांना नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी वातावरण निर्मिती करावी. त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ यांच्या सहाय्याने नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. देशभरातील 100 नवउद्योजकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलमुळे जिल्ह्यातील नवउद्योजकांना चालना मिळणार आहे. यामुळे विविध नवनवीन कल्पना मांडाव्यात. स्टार्टअप फेस्टिव्हलमध्ये सहभाग वाढविण्यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात येणार आहे.

फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी समिती स्थापन करून निधी उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सीएसआर, बँक, शासकीय आणि अशासकीय संस्थांकडून उपलब्ध निधीद्वारे आर्थिक उभारणी करण्यात येणार आहे. कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक नियोजन, गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविणे महत्वाचे असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

याशिवाय सोलापूर जिल्हा कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर असून कृषी उत्पादकाद्वारे प्रक्रिया उद्योग वाढविणे, आरोग्य क्षेत्रातही जिल्हा आरोग्य हब होत असल्याने औषध उद्योग वाढविणे यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी मांडण्यात आल्या.

यावेळी नागपूर जिल्ह्याने स्टार्टअपचे कशापद्धतीने नियोजन केल्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!