नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना निवेदन देताना विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे. |
स्थैर्य, वडूज, दि.२५: वडूज नगरपंचायतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेची कामे संबंधित विभागाचे अभियंता पद रिक्त असल्याने कामे पुर्णपणे रखडली आहे. तरी तात्काळ संबंधित विभागाच्या अभियंताचे पद भरून लभार्थ्यांच्या कामांची बिले अदा करावीत. अन्यथा 30 सप्टेंबर रोजी जन आक्रोश मोर्चा काढून नगरपंचायतीला टाळेठोक आंदोलनाचा इशारा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार या योजनेनुसार 340 घरकुलांचे उद्दिष्ट नगरपंचायतीला असताना 30 टक्के घरांना मंजुरी मिळाली आहे. तर 30 टक्के घरकुलांचे काम चालू असताना त्या घरांची फक्त 40 टक्के बिले अदा केलेली आहेत. लाभार्थ्यांना उर्वरित बिले मिळत नसल्यामुळे त्यांच्या घरकुलांचे काम अर्धवट राहिलेली आहेत. लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण होण्यासाठी नगरपंचायतमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. परंतू नगरपंचायतीचे पंतप्रधान आवास योजनेचे अभियंता पद हे रिक्त असल्यामुळे नगरपंचायत प्रशासन लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या योजनेला घरघर लागली आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या जीआर नुसार कृषी क्षेत्रात या योजनेचा लाभ शेतकरी यांना घेता येत नव्हता. नवीन जीआर नुसार या योजनेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु पंतप्रधान आवास योजनेचा अभियंता पद रिक्त असल्यामुळे या योजनेपासून सर्वसामान्य व शेतकरी वर्ग वंचित राहणार आहे. यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सत्ताधारी पक्ष यावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. यातून नगरपंचायत प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून येत आहे. येत्या दहा दिवसात नगरपंचायत व सत्ताधारी पक्षाचा कारभार सुधारला नाही व या योजनेचा लाभार्थ्यांना त्यांच्या लाभापासून वंचित ठेवल्यास सत्ताधारी पक्ष, नगरपंचायत प्रशासन यांच्या विरोधात सर्वसामान्य लाभार्थी व शेतकरी यांना घेऊन 30 सप्टेंबर रोजी जन आक्रोश मोर्चा घेऊन नागरपंचायतीला टाळेठोक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी निवेदनात दिली आहे.