जिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांसाठीची उपचार सुविधा त्वरीत सुरु करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

आ. शिवेंद्रसिंहराजे; सिव्हीलमधील कोरोना बाधीतांना जंबो कोव्हीड सेटरमध्ये हलवण्याची मागणी

स्थैर्य, सातारा, दि. १० : गेल्या सात- आठ महिन्यांपासून कोरोना या साथीच्या आजारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना साथीचा फैलाव सुरु असल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात फक्त कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वास्तविक पाहता जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील गोर गरीब रुग्णांची आरोग्यवाहिनी आहे. मात्र कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात ह्रदयविकार, डायलेसीस, मधुमेह, सर्पदंश, जळीतग्रस्त, महिलांची प्रसुती यासह इतर सर्व आजारातील गंभीर रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार होवू शकत नाहीत. त्यामुळे अशा हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जंबो कोव्हीड केरअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत रुग्णांना सर्व सोयीनीयुक्त जंबो कोव्हीड केरअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलवावे आणि जिल्हा रुग्णालयात पुर्वीप्रमाणे इतर सर्व आजारातील रुग्णांवर उपचार सुरु करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहाजे यांनी म्हटले आहे की, गेल्या सात, आठ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या. जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीतांवर उपचार करण्यासाठी १५८ बेड तयार करण्यात आले. त्यामध्ये आयसीयू मधील २० बेडचाही समावेश आहे. जिल्हा रुग्णालय हे संपुर्ण जिल्ह्याची आरोग्य वाहिनी आहे आणि या रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांची तपासणी आणि उपचार सुरु असतात. जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना खासगी हॉस्पिटल्सचा खर्च परवडत नसल्याने विविध प्रकारच्या आजारांसाठी जिल्हा रुग्णालयाचाच आधार असतो. मात्र कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांवर उपचार बंद झाले. ह्रदयविकार, डायलेसीस, सर्पदंश, भाजलेले रुग्ण, गरोदर स्त्रीयांची प्रसुती यासह इतर सर्व प्रकारचे गंभीर आजारी रुग्णांना गेल्या आठ महिन्यांपासून उपचाराविना रहावे लागत आहे आणि त्यांचे अतोनात हाल होत आहेत.

जिल्हा प्रशासनाने जंबो कोव्हीड केअर सेंटर उभारले असून त्याचे नुकतेच उदघाटन झाले आहे. येत्या सोमवारपासून हे सेंटर सुरु होणार आहे. या सेंटरमध्ये ५० बेड व्हेंटीलेटरयुक्त तर २५० बेड ऑक्सिजनच्या सुविधेने युक्त असून या सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या सेंटरसाठी वैद्यकीय स्टाफही नियुक्त असून त्यांना वेतनही चालू राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांप्रमाणेच इतर सर्व प्रकारच्या व्याधीने गंभीर आजारी गोरगरीब रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत रुग्णांना जंबो कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलवल्यास त्यांना या सेंटरमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध होईल आणि त्यांच्यावर चांगले उपचार होतील आणि तसे झाल्यास जिल्हा रुग्णालयात पुर्वीप्रमाणे इतर व्याधीग‘स्त रुग्णांना उपचार मिळणे सोपे होईल. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेवून कोरोनाबधीतांना जंबो कोव्हीड सेंटरमध्ये हलव्यात यावे आणि उपचारापासून वंचीत असलेल्या इतर रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करुन त्यांचे हाल थांबवावेत, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!