सुशिक्षित बेरोजगारांसाठी भरती प्रक्रिया तातडीने सुरु करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे.

विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना नूतन वर्ष 2021 साठी शुभेच्छा दिल्या असून पत्रात म्हटले आहे की, आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटकाळाचा यशस्वीपणे मुकाबला करीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.

आपणास विदित आहेच की, महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरू तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-1, वर्ग-2 आणि वर्ग-3 विभागातील सेवाभरतीच्या प्रतिक्षेत आहे. या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

कोविड-19 महामारी संदर्भात परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने नवीन वर्ष 2021 पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरु करण्यात यावी, त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी. अशी सूचनाही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी मांडल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!