स्थैर्य, सातारा दि. १३ : ग्रामिण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ऑफलाईन प्रवेश शिवाय विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित मानला जाणार नाही. यासाठी महाविद्यालयात येण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी ग्रामिण भागातील एस.टी .बस सेवा काही अटिंसह सुरू करावी अशी मागणी करणारे निवेदन विद्रोही विद्यार्थी संघटना, महाराष्ट्राच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने सातारच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
विद्रोही विद्यार्थी संघटना, सातारा जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संकेत माने- पाटील, शुभम ढाले, रश्मी लोटेकर हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या मिशन बिगीन अंतर्गत काही नियम व अटींनुसार काही व्यवहार सुरळीत होत आहेत. यामध्ये जिल्हा अंतर्गत एसटी बस सेवा सुरू करावी असेही आदेश आलेले आहेत. परंतु जास्त प्रवासी मिळत नाहीत अशा कारणाने सर्व मार्गावर एसटी सेवा अजून सुरू केलेली नाही वास्तवात प्रवाशांच्या सेवेसाठी धावणारी एसटी नफा मिळत नाही म्हणून बंद ठेवणे योग्य नाही.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्या साठी कोणतेही साधन नाही. रिक्षा, टेम्पो साठी जवळपास ४०० ते ५०० रुपये भाडे सांगत आहेत. लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयीन फी , इतर खर्च , गाडी भाडे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना परवडणारे नाही असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाची प्रत एस.टी. महामंडळाचे सातारा विभागाचे विभाग नियंत्रक यांनाही देण्यात आली आहे.