स्थैर्य, पाटण, दि. 30 : खरिप हंगामाच्या पूर्वार्धात रोहणी नक्षत्रावर नावडीच्या शिवारात धुळवाफ भात पेरणीची सुरूवात झाली असून या हंगामात शेतकरी सर्व तयारीने सज्ज झाला आहे.
या वर्षी ऊस गळीत हंगाम वेळेत संपला व खरिप हंगामासाठी शेतकरी राजाला भरपूर वेळ मिळाल्याने ऊस काढणी ते पेरणी योग्य मशागती करता आल्या. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉगडाऊन जाहीर झाल्यापासून शेतकर्यांना मशागतीसाठी चांगली संधी मिळाली या काळात शेतीची सर्व कामे करता आली. वळीवाचा पाऊसही योग्य संधी घेऊन आला. या संधीचा योग्य फायदा घेऊन शेतकरी पाणी सोय पाहून कोरड्यावर इंद्रायणी भात पेरणी करीत आहे. काही ठिकाणी क्षेत्र भिजवून पेरणी करीत आहे. रोहणी नक्षत्राचा पेरा लाभदायक मानला जातो. कोयना नदी काठावर नावडी, मंद्रूळहवेली, नाडे, सोनावडे या विभागात धुळवाप पेरण्या होत आहे.
गत वर्षाचा खरीप हंगाम अतिवृष्टी, महापूर व पुन्हा अवकाळी या निसर्ग संकटात वाया गेला. नदी काठावर पिकांची कुजल्यामुळे वाईट अवस्था झाली. शेतकरी हताश झाला. बागायत पिकांनीच हातभार दिला. या हंगामात इंद्रायणी भात पिकांना पसंती देऊन रोहीणी नक्षत्रावर पेरणी सुरु केली.