दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२१ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघांमधील सातारा जिल्ह्याच्या फलटणमध्ये कोणतेही पासपोर्ट केंद्र कार्यान्वित नाही. तरी फलटण येथे पासपोर्ट केंद्र तातडीने चालू करावे, अशी मागणी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय संचार राज्यमंत्री देवसिंह चौहान यांच्याकडे केलेली आहे.
याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, माढा लोकसभा मतदारसंघांमधील फलटण येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी फलटण वरून सातारा येथे सुमारे 64 किलोमीटर असा मोठा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे फलटण येथे पासपोर्ट केंद्र मंजूर करून तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी प्रामुख्याने फलटण तालुक्यासह माण, खटाव व खंडाळा तालुक्यातील नागरिकांनी केलेली आहे.
तरी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र चालू करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सुध्दा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.