सातारा सोलापूर मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करा

शिवसेना महिला आघाडीची निवेदनाद्वारे मागणी


स्थैर्य, सातारा, दि. 27 सप्टेंबर : पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना, अधिकार्‍यांना सोलापूर येथून दक्षिण भारतात जाण्यासाठी रेल्वेने जाण्यासाठी कोरेगाव आगाराने सातारा सोलापूर (रेल्वे स्टेशन) मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेना महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

महिला आघाडीच्या शहरप्रमुख उल्काताई मालुसरे, ललिताताई पोतदार कोरेगाव आगाराच्या व्यवस्थापिका नीता जगताप यांना या मागणीबाबत निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण भारतात जाण्यासाठी रेल्वेद्वारे प्रवास सोयीस्कर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशी, भाविक आणि अधिकारी वर्ग सोलापूर येथून रेल्वेद्वारे प्रवास करतात. सोलापूर रेल्वे स्टेशन ते सोलापूर एस. टी. बस स्थानक हे अंतर जास्त असून रेल्वेच्या वेळापत्रकानुसार एस. टी. चे वेळापत्रक नसल्याने प्रवाशांना विनाकारण सोलापूर बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते.

कोणार्क एक्सप्रेसद्वारे सैन्य, वायुसेना आणि नौदलातील अधिकारी प्रवास करतात. त्याचबरोबर दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी, पिठापूर, श्रीशैलम व अन्य देवस्थानाला जाण्यासाठी देखील याच मार्गाचा वापर केला जातो. कोणार्क एक्सप्रेस ही सोलापूर येथे शक्यतो सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पोहोचते, मात्र, सोलापूर सातारा मार्गावरील बस ही सहा वाजता निघून जाते. त्यामुळे प्रवाशांना या बसचा उपयोग होत नाही. त्यांना पुन्हा आठ वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे कोरेगाव आगाराने सातारा सोलापूर रेल्वे स्टेशन ही बस सेवा सुरू करून ती रेल्वेच्या वेळापत्रकाच्या आधारे कार्यान्वित करावी, जेणेकरून सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असेही मालुसरे व पोतदार यांनी निदर्शनास आणून दिले.

आगार व्यवस्थापिका नीता जगताप म्हणाल्या, बसेवा सुरू करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असून या मार्गावर बसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


Back to top button
Don`t copy text!