स्थैर्य, कराड, दि. 26 : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, ती स्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर कोविड सेंटर सुरू करा, अशी सूचना राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याची पाहणी शुक्रवारी त्यांनी केली. त्यावेळी आ. चव्हाण यांनी माहिती घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या. या कोविड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेडची सोय होणार आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आ. चव्हाण यांनी 60 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून शहरातील कोरोना रुग्णालय उभे राहात आहे. त्या निधीतून 2 रुग्णवाहिका व 10 व्हेंटिलेटर दिले जाणार आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला मात देण्यासाठी आ. चव्हाण यांनी वेळोवेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी समन्वय साधत चर्चा केली आहे. त्यातूनच शहरातील कोरोना रुग्णालयांचे अधिग्रहण सुरू आहे.
1 हजार 400 हून अधिक बेडचे नियोजन केले आहे. त्या घोषित बेडपैकी 90 टक्के बेड उपलब्ध झाले आहेत. शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 50 ऑक्सिजन बेडचे कोरोना उपचार सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.