फलटण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग; युवा कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर शक्ती प्रदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि. २३ : आगामी काही महिन्यांमध्ये फलटण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कार्यरत असणारे आजी-माजी सदस्यांसह हौसे, नौसे, गवसे यांनीही आता सोशल मीडिया सह गावांमध्ये आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या मुळे फलटण तालुक्यातील ग्रामपंचात निवडणुकीची लगबग फलटण तालुक्यात सुरु झाल्याचे समोर येत आहे.

फलटण तालुक्यामधील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहेत. या निवडणुकीमध्ये आजी-माजी सदस्यांचे दावे-प्रतिदावे सुरू असताना काही युवा कार्यकर्ते ही पुढे येऊ लागले आहेत. यामध्ये आपण सर्व युवकांना पुढे घेऊन आपणच एक स्वतंत्र पॅनल टाकू अशी परिस्थिती बहुतांश गावांमध्ये निर्माण झालेली आहेत. परंतु ही परिस्थिती निवडणुका लागेपर्यंत किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत टिकून राहते का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी पक्ष व इतर गोष्टी सोडून एक स्वतंत्र पॅनेल तयार केला जातो. गावपातळीवर बहुतांश सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असते. यामध्ये आता युवा कार्यकर्त्यांची भूमिका हि महत्त्वाची ठरणार आहे. आगामी काळामध्ये युवकांची संख्या मोठी असल्याने व युवक कार्यकर्ते हे सातत्याने गावासाठी झटत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावच्या विकासाचाच प्रश्न महत्वाचे ठरणार आहेत. राज्य, जिल्हा किंवा तालुक्यात काय विकास केला, किंवा तिथे सत्ता असल्याने नेमके कोणकोणते प्रश्न सोडवू शकतो हे सर्वच मतदारांना ज्ञात आहे. परंतु आता गावच्या विकासासाठी नक्की कोण काय करते व निवडणूक झाल्यावर दिलेली आश्वासने नक्की कोण पाळणार आहे, याचाच विचार मतदार करतील यात कसलीही शंका नाही. सत्ताधारी मंडळी हे त्यांनी काय विकास केलं हे मतदारांना सांगण्याचा प्रयन्त करतील तर विरोधक हे सत्ताधारी मंडळींनी कसा गावाचा विकास राखडवाला याचा डंका पिटतील यात कसलीही शंका नाही. आगामी काळात मतदारच हेच आता या वेळी कोणाला निवडून द्यायचे हे ठरवतील. परंतु ग्रामपंचायत निवडणूक असल्याने कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच चंगळ असणार आहे. 

फलटण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजेच राजे गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायतीमध्ये ही आपले वर्चस्व राखण्यासाठी राजे गट पूर्ण ताकतीने ग्रामपंचायत निवडणूक लढवेल, यात कसलीही शंका उद्भवू शकत नाही. त्यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही आगामी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची करून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी कार्यरत राहील असाही अंदाज बांधला जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!