दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । फलटण । राज्य शासनाने राज्यातील पाचवीपासून पुढील वर्गाच्या शाळा सुरू करण्यास नुकतीच मान्यता देत शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र केवळ पाचवीपासूनच नाही, तर सर्व वर्ग सुरू करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेची जास्त गरज असल्याने हे वर्गही सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेण्याची मागणी केली जात आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक कामकाज करण्यास प्राधान्य द्यावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र ऑनलाइन पद्धतींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. परिणामी राज्य शासनाने पाचवीपासून पुढील वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेत मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर सरसकट शाळा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.