दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । सातारा । मागील कित्येक महिन्यांपासून शेळ्यामेंढ्याचे बाजार बंद आहेत. राज्यसरकारने तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून बाजार सुरू करावेत, अन्यथा पावसाळी अधिवेशनात मेंढरे सोडू असा इशारा मेंढपाळ आर्मीचे महासचिव नवनाथ हणमंतराव गारळे यांनी पुसेगाव ( ता खटाव) दिला आहे.
मागील कित्येक महिन्यांपासून मेंढपाळ आर्मी शेळ्यामेंढ्याचे बाजार सुरू करा, अशी मागणी करत आहे. तरीदेखील सरकार जाणुन बुजून दुर्लक्ष करत आहे. टाळेबंदी ,संचारबंदी आणि त्यानंतर व्यापार सुरू करण्याची घोषणा करून देखील केवळ बाजार चालू नसल्याने मेंढपाळांची कोकरं व्यापारी लोक कवडीमोल भावानं खरेदी करत आहेत. सरकारला मेंढपाळांची पिळवणूक दिसणार नाही काय असा सवालही श्री.गारळे यांनी यावेळी उपस्थित केला. मेंढपाळांच्या बाबतीत सरकार आंधळे झाले असून त्यांना मेंढपाळांची पिळवणूक दिसत नाही, असे मतही नवनाथ हणमंतराव गारळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातला मेंढपाळ शांत आहे. याचा चुकिचा अर्थ काढू नये. सध्या मेंढपाळ वेगवेगळ्या अनेकानेक समस्यांना तोंड देत आहे. बाजार बंद असल्याने मेंढपाळांची आवक जावक पुर्णतः बंद झाली आहे. मेंढपाळांची कोकरं पावसाळ्यात चढ्या भावाने विक्री होतात. परंतु बाजार बंद असल्याने त्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहेत. येत्या काळात बाजार सुरू नाही झाले तर मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय सांसद प्रमुख अर्जुन थोरात यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनात मेंढरं सोडू असा इशाराही मेंढपाळ आर्मीचे महासचिव नवनाथ हणमंतराव गारळे यांनी बोलताना दिला.