स्थैर्य, फलटण दि. ०९ : गेल्या 25 वर्षांपासून लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेले झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले ग्रामीण रुग्णालय त्वरीत सुरु करावे. हे रुग्णालय सुरु न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन झिरपवाडी ग्रामस्थांच्यावतीने फलटण तहसिलदारांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी 8 एकर जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर या जागेत या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. यासाठी सन 1997 साली राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर यांना सामाजिक कार्यक्रर्ते दशरथ फुले व इतरांनी निवेदन दिले होते. त्यानंतर राज्यपालांच्या आदेशानंतर हे रुग्णालय सुरु झाले होते. पढे दोन वर्षे हे रुग्णालय सुरु झाले व नंतर ते पूर्णत: बंद अवस्थेत आहे. या रुग्णालयाकडे 20 ते 22 वर्षांपासून दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणच्या दारे, खिडक्या, यंत्र सामुग्री चोरीला गेले आहेत. इमारतीलाही तडे गेलेले आहेत. हे रुग्णालय पुन्हा सुरु होण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. कोरोना काळात या ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती होऊन या ठिकाणी कोरोना उपचार केंद्र सुरु करुन नागरिकांना दिलासा मिळणे आवश्यक होते. मात्र गेल्या 7 – 8 महिन्यांपासून केवळ देखभाल दुरुस्तीचे आराखडे, अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरु असल्याचे सांगून इमारतीकडे अजूनही दुर्लक्षच सुरु आहे. विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी 7 सप्टेंबर 2020 रोजी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे, आमदार दीपक चव्हाण व इतर अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या ठिकाणी भागीदारी तत्वावर संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय उभारण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र 7 महिन्याचा कालावधी उलटूनही याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावरुन तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून या ठिकाणी तातडीने रुग्णालय सुरु न झाल्यास ग्रामस्थ मोर्चा, उपोषण, धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर 100 हून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.