महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२३ । चंद्रपूर । महाराष्ट्र वन विकास महामंडळाने आपल्या पूर्ण क्षमतेने काम करावे. केवळ सरकारी नजरेतून कुठल्याही कामाकडे न बघता वैयक्तिक जबाबदारी म्हणून कामात झोकून द्यावे, महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) वतीने मंत्री श्री.  मुनगंटीवार यांच्या हस्ते फॉरेस्ट किट बॅग व वाहन वितरण करण्यात आले. यावेळी एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य व्यवस्थापक (नियोजन) संजीव गौर, महाव्यवस्थापक (व्यवसाय विकास) रवींद्र वानखेडे, नागपूर प्रदेश महाव्यवस्थापक चंद्रशेखर बाला एन., जळगाव उपवनसंरक्षक प्रवीण ए., नागपूर वन प्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक आर.आर. बारटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे व विपणन तसेच विक्री प्रतिनिधींच्या प्रेझेंटेशनचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, ‘आपले शास्त्र, आयुर्वेदाची परंपरा जगाने मान्य केली आहे. या परंपरेचे संवर्धन करण्यासाठी रोपवाटिका विकसित करा आणि त्याठिकाणी आयुर्वेदिक रोपांची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करा. आज ३०० कोटींची उलाढाल उद्या एक हजार कोटींची होईल, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. काम वाढविताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रस्तावांना लागणारा प्रशासकीय वेळ कमी करण्याची जबाबदारी माझी आहे.’ एफडीसीएमच्या कामामध्ये गती असावी, कुठलाही ताण नसावा,महामंडळांच्या निर्णयांना गती देण्यासाठी मी पूर्ण शक्तीनिशी तुमच्या पाठिशी उभा आहे,’ असा विश्वासही त्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.

हॅपिनेस इंडेक्स वाढतो

जेवढ्या वेगाने प्रस्ताव येतात तेवढ्याच वेगाने ते मंजूर झाले पाहिजे. त्या प्रस्तावांवर निर्णय झाले पाहिजे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे काम पूर्ण करण्यासाठी माझा आग्रह आहे. काही गोष्टी केवळ पैशांमध्ये मोजता येत नाहीत. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात जेव्हा एक कुटुंब एकत्रितपणे फिरण्याचा आनंद घेते, तेव्हा हॅपिनेस इंडेक्स आपोआप वाढतो. आनंदी जीवनाची टक्केवारी वाढविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

जगाला पोसणारे तीनच विभाग

जगाला पोसणारे केवळ तीनच विभाग आहेत. त्यात कृषी, मत्स्य आणि वन विभागाचा समावेश होतो. आणि आपण वन विभागातील जबाबदार व्यक्ती आहोत, याची जाणीव ठेवून काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 


Back to top button
Don`t copy text!